सोमवार, ३० एप्रिल, २०१८

#चंद्रचुरा - एक शुक्लार्पण

अनुमोघें अनंते अनादी अनोखे
इथे व्यक्त स्पंदातले भाव लोके
नसे ते ना मोती न माती असे ते
जणू चंद्रचुरा माखले गाव होते. 

कळी मोदतो मोजता श्वास जेव्हा
खळी गोंदतो भोवती रास ठेवा
कला त्या कलाने उजले भोवताली 
जणू स्पर्श ओघे खुळे भाव होते.

नको रे नको ती वेदना चीर काया
जिच्या कुंदनी भेटती मोह माया.
खगांच्या परांची घुंगराळी नदी ती 
निळ्या वळणांनी चांदणी नाव होते 

आता दूर गेले मनातील नाते
नसे जे ना माझे ,ते माझे का होते!
किती विस्मयाने जगवा मनू मी
जगावा असा की जगणेच घाव होते..

अता विश्वकाळी घडावा जणू मी
अता बोधकाळी कळावा अणू मी
अता विश्वरूपे असे मी नसे मी
नसे, अंत नाही अशी मी धाव होते.

(बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा)


-भूराम (४/३०/२०१८)

शनिवार, २८ एप्रिल, २०१८

पांघर

तो :
----
मला वाटे बोलावेसे 
नाही बोलणे कधीच.
डोळे आसवांचे झाले
पाया लागली गे ठेच. 

सांज कळली ना कुणा
नाही कळले गुपित. 
जेही मनांत साठले 
त्याची कुणा देवू वेच. 

मना पोखरून झाले
पणा ओरखडे गेले
गेल्या मढल्या दिसाचे
पुन्हा पडे नाही पेच. 

आता गाभूळ बोलतो
आणि पेलतो बाभूळ 
दूर आभाळ दिठीला
कसे कळणार हेच. 

ती :
----
नाही नसू दे नात्यात 
तोच गोडवा कालचा
तळहातावर रेषा
नको वाटू दे रे खाचा.

घडे घडणे घडते
मन जडणे जडते
किती गुंतवावे कुणा
प्रश्न असे ज्याचा त्याचा

रोज ओघळू दे ऋण
गेले जावू दे वाहून
नको साठवू कुणाला 
नको वेचू त्याच काचा. 

गेले क्षण, न्हाले मन  
रात नवी, नवे ऊन 
रोज प्रवास नव्याने 
नित पांघर उद्याचा 

-भूराम (पुणे ४/२८/२०१८)

शनिवार, २१ एप्रिल, २०१८

समई

पळभरता  वदते
वाद करते समई
हलकेच नोंदवून
रात कोरते समई

दिन पाखर सांजता
श्वास भरते समई
दूर दिपल्या माळेत
प्राण भरते समई

गूढ आभाळ मिठीत
चांद धरते समई
ग्रह ताऱ्यांचा भोवती
हार करते समई

तुळशीच्या भोवतीला
फेर धरते समई
किणकिण देव्हार्यात
ध्यान धरते समई

दोन नमल्या डोळ्यात
भाव पेरते समई
रोज शुभम करोति
छान म्हणते समई

-भूराम
४/२१/२०१८ (पुणे)

मंगळवार, १७ एप्रिल, २०१८

कावळ्यांची ढुकं

देवाजींने तिका
दिला दान देह
रूप दिले तिका
भवा दिला मोह.

देवाजीच्या देहा
बिलगे कापड
नजरांचे फड
नाचवती मढ़

देवाजीच्या देहा
बिलगती नाती
कातळाची माती
तुळशीला जड

देवाजीच्या देहा
टोचले बोचले
वासनांचे हेले
पोसणारी डोकं

देवाजीच्या भवा
घडते रे काय
द्रौपदीची हाय 
जग बघे वग.

देवाजी ही  तिचा
कर ना सांभाळ
नजरा वंगाळ
गढूळला डोह

देवाजीला मागे 
हाडांचे सापळे
मासांचे ते गोळे
शमविना भूक

देवाजीच्या देहा
तिने केले दान
पिंडीतला प्राण
कावळ्यांची ढुकं

-भूराम
४/१८/२०१८