शनिवार, १७ जून, २०१७

मी एक माणूस

बांधलेला स्वर्ग , कोरलेला नर्क
त्या मध्ये जेही आहे ते
ओरबाळून जगणारा
मी एक माणूस !
वर तो पाऊस सांडणारा
खाली तो खळाळून भांडणारा
त्यात स्वतःस सदा विसळणारा
मी एक माणूस!
घडतात चुका माझ्याकडून
कळतात चुका कधी मला बघून
धावणाऱ्या जीवन सरितेत
सदा नवे नाव घेऊन जन्मणारा
विसरभोळा
मी एक माणूस
-भुराम

रविवार, ४ जून, २०१७

टिपतो इशारा...



गोठ्विला वारा,
गुंजविला सारा
निळ्याश्या नभाने आज
मांडिला पसारा.
अलवार होता,
काजचा तो ठोका
हळूच झेलता थेंब
चमचम तारा.
ओली धानी काया
गंध मॄदुमृदू माया.
स्पर्श सभोवाचा होता
नाचतो शहारा
पल्लविचा नाद
मनी सुखाचा संवाद
आज येणे सखे तुला
टिपतो इशारा...

-भुराम
June 4, 2011

शनिवार, ३ जून, २०१७

तू सखे कविता

घन  तृष्णेच्या स्पंद तिरावर
चंद्र वैभवी जाणून घे तू
अवकाशातून जाणीव झरता
नयन आर्जवी ओघळ हो तू

शोध नको तो उगा जान्हवी
अव्यक्ताच्या तिमिर सलातून
वेग तसा मी किती रोखतो
अनावर होतो गहिवर आतून
रोध जरी मग तुझा लाघवी
मिठीत येता अवखळ हो तू .

ओंजळ माझी निळी सांडली
भवतालीच्या रेखीव काठी
तृप्त मनाच्या मिलन कळीला
स्पंद गुलाबी बिल्वर गाठी
किणकिणता ती मंजुळ सरिता
सहज क्षणांची खळखळ हो तू

देवदार तो उभा देखणा
झुळके सरशी नृत्य शहारी
पर्वत रांगी घोघावणारा
वारा हर्षी मुक्त विहारी
लेवुनी त्यांच्या मुक्त छवीला
नाद पेरती सळसळ हो तू

तप्त द्रुमीची ऊन सावली
जडभारत जो जगे पावली
शून्यात रोखल्या नजरे आतून
सूक्तांची मग उधळण झाली
कुणा कळावी किती वळावी
अशी एकदा अवघड हो तू .

व्योम व्योम ते कापूर जाळी
रक्त खुणांच्या संचित भाळी
तिथे पाखरे मुक्त थव्यासवे
रोज रेखती भव्य सकाळी
कळतील जरी ही कुणा इशारे
 तू सखे कविता निर्मळ हो तू .

-भुराम