रविवार, १६ डिसेंबर, २०१२

||जगणे आहे||

ओंजळीतले घरटे तुटले,
काज निळेशे काहूर फुटले
जखमांची ती खपली त्यावर
आसवेच ही, चरचर रुतले.

कोण म्हणावा दिडदा आणि
की गंजलेली खरखर म्यांनी.
नाद कळेना कुठला आहे,
जीवन गाणे असेच म्हटले.

आज काहीसे थांबून बघतो,
ते गेलेले वैभव जगतो,
त्या तुटल्या घरट्यावर मग
किती श्वास बघ असेच सुटले.

सार बाजूला जगणे आहे.
सुर्य उद्याचा बघणे आहे.
गेली नाही उमेद अजुनी.
झोप आता तू डोळे मिटले.
...
ओंजळीतले घरटे तुटले....

-भूराम
12/16/2012

शुक्रवार, १४ डिसेंबर, २०१२

भोई

रानधुळीचा साजण
साद घालितो एकाकी
त्याच्या सभोवाला होती
सांज प्रेमाची लकाकी.

प्राण पांघरून येते,
चांद नदीची किनार.
त्यात भिजलेला होतो
त्याच्या डोळ्यातील पार.

दूर देखणे शिवाचे
दिसे एकले देऊळ
देह थकलेला त्याचा
वाट झालेली गढूळ.

चालताना गुणगुणे तो
गाणे पालखीचे गोड.
दूर झालेले कितीक
मना सोबतीला ओढ.
...
गाणे पालखीचे गोड,
मना सोबतीला ओढ.

-भूराम
१२/१४/२०१२

बुधवार, १२ डिसेंबर, २०१२

हळद


आभाळ धुळीशी, पाउस पल्लव
सांजत्या धरेला जडते निरव
वाटेत सोनेरी कोसळावे दवं
दाटता उरात मायेचे आठव.

पाखरले थवे, चाहूल नविशी
चांदण दिशेला ओढ ही हवीशी,
तुटते काहीसे जोडण्या नवेते,
असाच काहीसा उरात कालव.

लाजरी साजरी घालमेल उरी
गवसले काही, हरवते जरी
दाटलेले वेड्या मायेचे माहेर
साजण डोळ्यात, वेचतो आसवं.
.
-भूराम
12/21/2012