शुक्रवार, ७ जानेवारी, २०११

आकाश मंद मी बघतो...

स्निग्धा गतीमुग्धा
नियमित चंद्र मी जगतो.
विश्वाच्या स्पंद खुणांचा
आकाश मंद मी बघतो.

किरणांच्या वैष्णीव देहा
तो शांत असा प्रसवता
जाणीवे मोह गुरफटतो ,
स्पर्शाने रौरव धगतो.

धिक्कार कुणाचा करणे?
आयुष्य जणू चुरगळणे
छेडून दिक्कात मौनाला
मी गत वैभवास स्मरतो.

निर्माण देह आसुसला
नियतीचा बांध ही फसला.
उज्वले तुला जो शाप
काळोखी सुधा तो स्रवतो.

चंदने घर्षीतो वारा
नंदने कुंतले सारा
रोमात गुंतला काळ
अलगद नीरवत सरतो.

मग...
आनंदे बधीर क्षणांशी
मी बोलून जातो सारे
असेल जेही भोवती
आकाश मंद मी बघतो...
आकाश मंद मी बघतो...

-भूराम
(१/५/२०११)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा