शुक्रवार, २६ सप्टेंबर, २००८

!!!हे रुपार्या!!!


(एका मित्राच्या slambook मधे कधिकाळी ही कविता लिहली होती.)

सामर्थ्ये झळाळी तुची एक रुपार्या,
किती दुखः साहे, तुझी शांत चर्या.
परीस गंध माती, तव स्पर्शे ज्योती,
अहाहा! म्हणे मी अशी मिळो भार्या.

कळी देह लाही, प्रेम सुक्ते न्हाई,
तुझी कंठ विणा दिडदिडते मनाही.
स्वभावे कस्तुरी, चहूदिशेला दरळ,
अखिल ब्रम्हांडा झणी पाडशी भुरळ.
नवनिशांचे चांदणे तवं ओलस हासणे,
क्षणे लख्ख व्हावे मम काळोखात जीणे.
तूची व्हावी चालना मम जीवीत कार्या.
अहाहा! म्हणे मी अशी मिळो भार्या.

काहीच कळेना तुझ कोणती वेदना,
नील चक्षू किनारी का गुलाली खुणा?
का गिळते हुंदके, तुझे तुच एकाकी?
मज सदा हे छळते, जरी मी अनोळखी.
मी गुजतो मनाशी, गुढ दिठीच्या व्रणाशी
देवून टाक मला , जेही दुःख तुज अशी.
माझा हात पुढे, तुझा तू कराया.
अहाहा! म्हणे मी अशी मिळो भार्या.


--भूराम...

शनिवार, २० सप्टेंबर, २००८

नाहीत मनाला दारे

नाहीत मनाला दारे
आकाश नितळ सोन्याचा
वाटेत प्रकाशी होता
सुरनाद नव्या गाण्याचा

नाहीत मनाला दारे
चालण्यात गुंतले पाऊल
पंखात बळ ते माझेच
क्षितीजात उगवती चाहूल

नाहीत मनाला दारे
जळण्यात कोणता अर्थ
प्रखरता माझीच सांगे
जळण्यातले सामर्थ्य

नाहीत मनाला दारे
आभास चांदणी होतो
शोधता सभोवी काही
मनास कोरूनी जातो

नाहीत मनाला दारे
सुखाचा क्षणैक पाऊस
भीजणेच अनोखे होते
फ़िटते पूरी न हौस

नाहीत मनाला दारे
काढण्या विटा-चुनारे
आणु शोधून कोठून
तोडूनी ह्या मौनारे.

--भूराम...

शुक्रवार, १९ सप्टेंबर, २००८

घे आंमत्रण...!



देहाभोवती अलंघ्य बंधन

तोड मुला, तुज खुले हे अंगण.

अंगणात या एक जांभळी,

बहर तिला रे असे उन्हाळी.

दूर दिसे ते पळस वाकडे,

पूष्प प्रभेची तिला हरकडे,

हिरवे पाते, भ्रमरे गीते,

रंग, कुंचले, फ़ुलवी प्रीते.

वर दिसे ते निळे आकाश,

समोर तो रस्ता, तोडू पाश,

तुला जे यौवन, अम्रुत जीवन,

खळाळ झ-याचा हळवा उन्मन.

तिर नदीचा नसे तो दूर,

तीथेच गवसेल तुजला सूर.

गीत आर्जवी इवल्या खगाचे,

अजून नच कळॆ तुजला त्याचे.

कशास बघतो अवती भींती,

इथे रे तुजला कसली शांती,

घे आंमत्रण खिडकीतून वारा,

निसर्ग तुला खुणावतोय सारा.


--भूराम.

१/२/२००१

मला वाटते... माझ्याचसाठी.


ह्या हलक्या फ़ुलक्या कवितेत मी माझ्या कालेज जिवनातील एक प्रसंग मांडलाय...

संध्याकाळी,...
दररोज...
बसतो गच्चीवर,
गॅलरीत...तूही येते,
मला वाटते... माझ्याचसाठी.

पाहता मी
तुझ्याकडे...
मधेच...
फ़ेकून नजर
मजवर...
तूही देते...
मला वाटते... माझ्याचसाठी.

चालू असतो असाच खेळ
अंग मोडणे...,
केसं उडणे...
ओढ्णीला ते मधेच छेडणे.
मीही डोळ्यांनी टिपीत रहातो
अस्वस्थ मनाला तुझे वेढणे.
मग संध्या हळूच सरते...
मी उतरतो...
तू ही फ़िरते...
मला वाटते... माझ्याचसाठी.

खोलीतून मग मी पाहू लागतो...
दिवा पेटतो..
खिडकीत...
ओझरती...
तूही दिसते...
मला वाटते... माझ्याचसाठी.

---भूराम...२१/०७/२००१

रविवार, १४ सप्टेंबर, २००८

उभारी


उडणा-यांनो आकाशात या
घ्या मनाची स्वैर भरारी.
जगणा-यांनो बंधने तुमची
बंधनात घ्या सदैव प्यारी.

रोष जगाचा होतो आहे,
होत असेल तर होवू दे आता.
भीती जगाची कोण उराशी,
उर असेल तर लिहुया गाथा.

उगवतीचे रंग विखुरते,
विखुरतेय पहा तेज असेच.
अंधाराचेही राज्य सरते,
सरेल आपले दुःख तसेच.

पेटवू या आत्म स्वयेच,
स्वयेच कळेल वाट पूढेच.
चालणार-यांना भय ते कसले,
कसले आता थांबणे नसेच.

चैत्यंन्याची ही अलोट गंगा
’गंगे’ सुर गुंजू दे शिवारी
चहुकडे अहा! आपुलेच राज्य
राज्यात ह्या नवी उभारी...


--भूराम
२८/११/२००१

तो वेडा की मी वेडा?


मळकटलेल्या रस्त्यावरती
मळकटलेली काठी घेवून
मळकटलेल्या अंगावरती
मळकी-फ़ाटकी कपडे लेवून
मळकटलेल्या पायांनी या
चालत होता अनवाणी...
तो वेडा तो वेडा तो
चहू दिशेतून एकच वाणी...

चिले पिले अवती भवती
कलकल कलकल करीत होती
हसत खिदळत दगडे मारून
घाव अंगावर कोरीत होती
तो बिचारा काठी हातची
भिरकावे मधेच वैतागूनी
तो वेडा तो वेडा तो
चहू दिशेतून एकच वाणी...

चेहरी आणून भाव बोलतो,
"करेल जादू टोणा मी,
उंदीर बनवून एकेकास
भरेल माझा गोणा मी".
घाबरती का? बच्चे आजची!
असल्या युक्ती नसे जुमानी.
तो वेडा तो वेडा तो
चहू दिशेतून एकच वाणी...

शिव्या ओठी, डोळ्यात लाली
ओरडला तो आदळून काठी
क्षणात पांगूळली इथे तिथे,
जेव्हढी झाली होती दाटी
बदलू लागली वाट आपुली
येती जाती माणसं शहाणी
तो वेडा तो वेडा तो
चहू दिशेतून एकच वाणी...

कोप-यात बसला चोरून अंग
सावलीत काही थरथर होता
माणूसकीच्या ह्या जगावर
कुठला ’साप’ सरसर होता?
डोळ्यात मग आभाळ गोठले
आसवात सारी घळली गाणी.
"तो वेडा की मी वेडा ?"
हळूच सुर घुमला कानी...!

-भूराम
१३/७/२००१

बुधवार, १० सप्टेंबर, २००८

माझ्या काही चारोळ्या...

प्रयत्न असतं, जगणं असतं.
आभाळकडे बघणं असतं.
पून्हा काही नविन निर्माव
हेच पावसाला मागणं असतं.

*****************

आभाळ पून्हा तेच सांगतं
जगणं मात्र विसरू नको.
पावसाच्या थेंबा थेंबात
भिजणं मात्र विसरू नको.

*****************

सगळं सगळं करावसं वाटतं
सगळं करतांना मीच विखुरतो
पून्हा एका जागी एकत्र येतानां
आयुष्य मात्र हरवतो.

*****************
आपल्या भेटची शेवटची आठवण
अजून मला आठवत होती
दूर जातांनाची तुझी आसवं
अजून डोळ्यात दाटत होती.

******************
मी आयुष्याचा जन्म मुठीत घेवून.
मृत्युच्या दारात भरकटत होतो.
ज्याला आयुष्य ही नाही, मृत्युही नाही.
त्या अश्वत्थाम्याला शोधत होतो.

******************
अंधार हा चहुकडे आधीपासुनच असतो.
प्रकाश मात्र निर्माण करावा लागतो.
प्रकाश निर्मिणारयाला लोक सुर्य म्हणतात.
आणि चंद्राला फ़क्त आंधळे प्रेमीच बघतात.

---भूराम

...रास...

पियुषाचा पाऊस सभोती
धुंद धुंद ती नाचे रती
पाठीवरती केस मोकळे
स्तनात ऋतूरस पाझरती.

नयनात लवलव चंचलता
ओष्ठात द्रवली स्फ़ुलिंगता
लाजलाजरी, साज साजरी
नटली वेलून पूष्पलता.

पैंजणाची झुणझुण झुणझुण
कर्ण कुंडले मिणमिण मिणमिण
कुणी न आता येथे सभोवती
कुणास शोधे अधून मधून

आला द्रुत तो पवन मदन
झाली उन्मन शहारले तन
धुंद स्पंदने ते आलिंगन
पाहण्या लवले तरू नी गगन

वर्णू कसा मी बंध तयांचा
स्पंदू कसा मी स्पंद तयांचा
अपूरे माझे शब्द सांगण्या
आवेग कसा त्या दो उरांचा

रास रंगला असाच किती...
मी थांबलो तेथेच कीती!
येवून सांज कवेत माझ्या
चल घरला म्हणे सोबती.

--भूराम
२२/१२/२००१

रविवार, ७ सप्टेंबर, २००८

मीच मृत्युंजय आहे...


अनेक लक्ष, अनेक ध्येय आहे
इथे थांबणे आता व्यय आहे.
’पुढे चालणे’ कर्म हेच जन्मभर
मिळाले जेही मानूनी स्नेह आहे.

आता लक्षू दे मला तोच डोळा
जिथे अर्जूनाने रोवला बाण वेडा
आता लक्षू दे पून्हा ते श्वान मुख
ज्या एकलव्ये केले क्षणे मुक.
रिंगणे उतरू दे होवूनी मज कर्ण
अर्जुना जळू दे पाहूनी माझा वर्ण
असे संकटे खेळू दे भीष्म युध्द
मग कृष्ण हाता भाग घेणे आयुध.
या संर्घषगीता ऐक कैशी लय आहे...
इथे थांबणे आता व्यय आहे.

जेव्हा शकुनी हात खेळती धुर्तचाल
पणा लावीतो युधिष्ठीरी जेष्ठ्भाल
द्रोणा शीर कटे ऐकता मुर्ख थाप
जेव्हा सत्य-मिथ्या मोजता एक माप.
जेव्हा जयद्रथा अर्जून येई सामोरा
तेव्हा काय तो ग्रहणी हो सुर्य तारा.
जेव्हा वाढतो अर्जुना कर्ण-धाक
तेव्हा काय रुते धरी ते कर्ण चाक.
ऐशा नियतीची मजला सवय आहे...
इथे थांबणे आता व्यय आहे.

अजुनी द्रोपदी नग्न होते सभेत
अजूनी एक कुंती पोर देते नदीत
अजूनी द्रोणपूत्र दूध पितो पिठाचे
गुरुस एकलव्य रक्त देतो बोटाचे
अजूनी रोज कुब्जा आसवी वाहे प्रश्न
अजूनी शापग्रस्त रोज होतोय कृष्ण.
स्व-अस्तित्व शोधे अजूनी रोज कर्ण
अन्याये सवियीचे झाले ध्रुतराष्ट्री मौन
अशा जगतातील एक मी, होय आहे...
इथे थांबणे आता व्यय आहे.

निराशेस मारक रक्त आहे ह्या देहात
कितिही अभिमन्यू ठार होवू दे व्युहात
कितिही रोज इंद्र उभे राहू दे दारात
असे दानविराची वैभवी माझी जात
मीच गंगापूत्र, मीच तो पंडूपूत्र
होय दुर्योधनाचा मीच आहे मित्र
मीच आहे तो, इतिहास भारताचा
मीच शिल्पकार आहे तो उद्याचा
मी तरुण, मीच मृत्युंजय आहे...
इथे थांबणे आता व्यय आहे.

--भूराम...
१७/०६/२००२

सोमवार, १ सप्टेंबर, २००८

आज जगावे

दुःख आतचे असेच द्यावे, रक्त कालचे ओकून.
आज जगावे घडण्यासाठी, भान उद्याचे ठेवून.

मी मनाशी सदैव म्हणतो, किती विषारी हा वारा.
जगणे अधिकच दुष्कर होते, श्वास ठेवता कोंडून.

टाळू म्हणता, येत्या घडिला,
गमावून कितीक बसतो...
जगु म्हणता, तिच घडी ती,
ओरबाळून मनी जळतो...

असेच घडते दुःख आतचे, आतच दबले कुजले जर
दर्प विषारी गिळून टाकतो, आज उद्याला कोळून.

म्हणून म्हणतो टाक सख्या रे, रक्त कालचे ओकून
आज घडावे जगण्यासाठी, भान उद्याचे ठेवून.

-भूराम...