शुक्रवार, २२ ऑगस्ट, २००८

वेचतो निखारे...


शोधून काय आणू,
शब्दातली निराशा
आयुष्य पाहतो मी
नी वेचतो निखारे.

हां कोण तो उराशी
बांधून ठेवलेला...?
हृदयात चांदण्यांचे
आवेश बंद सारे.!

किरणांस स्पर्श झाले
देहातले निराळे.
संवेद मोजतांना
मी मागतो मलारे.

काहुर दाटलेले
पाऊल वाटवेडे.
मी पाहे ज्या दिशेला
माझेच प्रश्न सारे...!
...
माझेच प्रश्न सारे...?
श्वासात गर्द वारे...!
आयुष्य पाहतो मी
नी वेचतो निखारे...

--भूराम

रविवार, १७ ऑगस्ट, २००८

इथे तिथे नदी


इथे तिथे नदी

निळ्या आभाळाची होती

माझ्या पावुलात तिची

झुळते ग प्रिती


कोण छेडते कुणाला

आत भिडते मनाला

देह बांधला किनारा

हळवी ती नाती.


इथे तिथे नदी

ओल्या दिवसांची होती

थेंब टपोरया हातांनी

भिजवीते माती.


कोण रुजते कुणात

श्वास भरतो उरात

गंध सभोवात आता

दरवळे किती!


इथे तिथे नदी

माझ्या मनातही होती

खोल तळात रे तिच्या

आठवांचे मोती.


कोण शोधतो कुणाला

लख्ख करतो क्षणाला

आली वळवाची सर

नक्षत्रात स्वाती.


--भुराम...

शुक्रवार, १५ ऑगस्ट, २००८

पाढा--बे एक बे

वरह्यांड्यात बसून आई स्वतःच काम करत करत आपला अभ्यास घेते. आपण अभ्यास करत नाही म्हणून आईने bat-ball लपवून ठेवलीय. अंगनात सर्व मूल खेळतायेत. आणि मी ह्या सर्वात पाढा म्हणताना कसा भरकटत जातो आणि शेवटी आईच्या हातचा मार खातो. अस काहीस मी ह्या कवितेत मांडण्याचा प्रयत्न ह्या कवितेत केलाय.

बे एक बे
बे दुणे चार ,...
टेनिसचा बॉल,
कुठे गेला यार?
तिथं होती बँट
कुठे झाली गुडुप
आई ती उठली
ऊचलल सूप.
सुपातले गहू
"सांस की बहु ?"
पाखड़ता गव्हाला
शिंकला तो बाळ्या.
बाळ्याच्या हातात
भोवरयाची दोरी.
सुटलेला भोवरा
भिरभिर करी.
ओरडला रव्या
खिदळली ठमी
बाजूच्या बाकावर
चाललीय रमी.
राजा की राणी,
किल्वर का बदाम,
बूढी काय भजते
"रावण का राम?"
हातातली काठी
वाकडी कंबर
चष्म्यातले डोळे
बघे खाली-वर.
वाजली ती घंटी
कोण आला दारी?
ब्रेडवाला मामू
"टोस्ट की खारी?"
शेजारची काकू
बोलावते त्याला
काकुची चिंगी
चिडवते मला.
"चिंगी रे चिंगी
वाजव तुझी पुंगी"
रडू आले तिला
च्यायची ढोंगी.
पाठित धपाटा
"बे त्रिक आईsss!"
"अभ्यास कर पिंट्या
नाही तर खर नाही!"...
बे चौक आठ
दुखत होती पाठ
बे पंचे दहा
बे सक बारा.....
...
..
बे दाहे विस
चिंगी होती खवीस...

-भूराम

शनिवार, ९ ऑगस्ट, २००८

वेडा क्षण...!


असे जे सधन
निळे चिंतामण
फूले बाहुलीतून
तुझे कोवळे मन

दिठीतली मीठी
गर्द आणि ओली,
खुले श्वास माझा
अन हसावे यौवन.

जरी मी आठवावे
तुझेच भास् व्हावे
तुझी ती स्पर्शमुद्रा
मनी केलीय जतन.

खुळे ते ओठ हलती,
फुलांत रंग भरती,
बघून मी तो थांबलो
थांबला तो वेडा क्षण...!

असा जो सधन ...वेडा क्षण!

--भूराम

मंगळवार, ५ ऑगस्ट, २००८

चांदोमा



चांदोमा चांदोमा इतके गोरे गोरे कसे
मला मात्र मित्र सारी पाहून पाहून हसे

आणून कोठून गोरा रंग माझ्याकडे नाही
म्हणून दररोज रात्री मी तुझ्याकडे पाही.

एक म्हणे जारे तुझ्या चांदोमालाच माग
दूसरा म्हणे अरे त्याच्या चहरयावरती डाग.

राग मला तेव्हा त्यांचा खुप खुप आला
काय करू शेवटी तू एकाच मामा मला.

पळालो मी आईकडे शिरलो तिच्या कुशीत
'लाडका ग कृष्ण माझा' बोलली डोळे पूशीत.

--भूराम

शनिवार, २ ऑगस्ट, २००८

मनाच वैभव!

एक व्यापक विश्व डोळ्यासमोर असत. मी ही जाणिवात जगत असतो. निराळच असत ते मनाच वैभव! जगायला लावणार्या त्या दिवसाच शैशव! क्षणभर स्वप्नात डोलून हळूच उठतो. टवकारून बघतो. काहीसे ओळखिचे बोल कानावर पडतात. कोण ती ? काय ते शब्द? मी थांबतो, थबकतो. ओलसर मनात अनेक वलय उठतात. घेवून जातात कोठेतरी एका तळघरात. कालकुट्ट , गर्द, धीर,गंभीर, निशब्द काळोख. स्वतःलाच स्वतःअचा भय वाटावा इतका!..
"कधी मी बंद ,कधी मी नित्य?
कधी चाहुलिंच अनोळखी सत्य,
तो अंधार की मी अंधार?
का आहे हे मानसी अपत्य?"
अरे हां मी कुठे स्पर्श केला? अनेक थैमान चालू झालेत, वट्वाघूळींसारखे अनेकात किन्चाळू लागलेत... विचारांचे कलह...! भय,..भीती...त्रागा...भूक...तहान... एक एक मोजू लागलो आणि क्षणार्धात एक रांगड़ वैभव मला लपेटून घेत ,आपल्या मिठीत गच्च ... आणि मला कुचकरू लागत. मी चिडतो ,ओरडतो ,तोडू पहातो अनपेक्षितपणे आलेली बंधने.. मला नको असतो त्याचा तो वासनी स्पर्श.. त्याच आवेगात एक चपराक ओढून देतो .. त्याच्या कानात उठलेले असतात लाल वळ... माझ्या मनावर! तो लाल रंग गर्द होवू लागाताच क्षणार्धात डोळे उघडतात ..लख्ख होत . डोळ्यांच्या बुबुळावर काळे ठिपके वाढू लागतात. सांगू लागतात, "मी काजळ, ते आत जळालेल्या वैभावाच. कामा येईल तुला डोळ्यात अंजन म्हणून घालायला". डोळ्याच्या किनारयावर थोडी घाण जमू लागते...
"राहू दे मला इथे न जायचे कुठे
मी चालतो जगात ज्या जन्मती प्रेते!
नभात रक्त दाटले
देहात रक्त आटले,
हाडत्या पिंजर्यात,
सर्वस्व माझे फाटले.
रोज पाठ,रोज शाळा,
कोकिळेचा क्रूर गळा!
जाणिवांच्या शंकराला
हाय! पुजती भूते?
राहू दे मला इथे न जायचे कुठे..."

ते काजळ अंजन म्हणून माझ्या डोळ्यात भरून गेल होत, बोटाने डोळ्याच्या किनारयावरचि घाण पुसून टाकतो. तो दिपवणारा प्रकाश आता सवयीचा झालेला असतो. मन शांत झालेल असत आणि ते भावनांचे थैमान पाचोळ्यासारखे शांतपणे जमीनीवर मुकाट पडलेले दिसतात. मी केविलवाण्या नजरेने वर आकाशात बघतो. आकाशातला सूर्य एका भल्या मोठ्या शुन्यासारखा दिसतो... ते मनातल वैभव जाणवेनास होत ,एक रिक्तपणा गदगदून येतो. आसव टचकन डोळ्यात येतात.. ती निघून गेली असते.. ते शब्द पुसून गेलेले असतात.. फ़क्त असत अवती भोवती सांडलेल, दुरवर पसरलेल एक व्यापक विश्व आणि त्यात मी शुन्यासाराखा...

"मी मनाच्या पायथ्याशी थांबलो, झगडलो,
अन मनाच्या वैभावाशी भिडताच उखडलो ,
सावूलयांच्या स्वप्न रात्री मोजता मलाच मी
बेरिजताच शुन्य झाली, पोळलो मी रडलो?"

--भूराम

शुक्रवार, १ ऑगस्ट, २००८

तीच तू ग चंडिणी


समस्त स्री जातीला सलाम करून...


अशीच भेद तू नभा, चांदण्यांशी ऊधळूनि,
चंद्र तो तुझा कधी न, तू जगाची यामिनी.
निश्चला तुला म्हणू की, मी म्हणू निर्मला
खेचूनी जी सूर्य आणे तीच तू ग चंडिणी..


व्यक्त हे आवाज आहे शक्तीचे ,भक्तीचे
साद तू अशी खड़ी दे, बीज व्हावे मुक्तीचे.
तू नाही मोहात आता,तू असे मोहिनी.
खेचूनी जी सूर्य आणे तीच तू ग चंडिणी..


मी असा देहात आलो,थांबलो,... थबकलो!
पाहुनी तुला तुझ्या त्या तेजपूंजे भबकलो!
भस्मती तुझ्यात येता, तीच तू ग यज्ञिनी.
खेचूनी जी सूर्य आणे तीच तू ग चंडिणी..

स्वैर फेक तू स्वतः, जाणूनी विमुक्त तू,
व्याप्त तू,सशक्त तू, तूच विश्व,विरक्त तू,
तू नसे आसक्त आता, तू असे स्वामिनी...
खेचूनी जी सूर्य आणे तीच तू ग चंडिणी..

---भूराम